पुणे ,दि. २१ :- शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल महाराष्ट्र राज्य हिंदी अध्यापक संघातर्फे दिला जाणारा पुणे जिल्हा हिंदी आदर्श शिक्षक पुरस्कार आमदार सत्यजित तांबे (पदवीधर मतदार संघ, नाशिक) यांच्या हस्ते प्रा. अशोक ढोले यांना प्रदान करण्यात आला. या प्रसंगी साहेबराव घाडगे पाटील, (मा. उपायुक्त मनपा मुंबई, संस्थापक अध्यक्ष त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान) मिलिंद कांबळे (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य हिंदी अध्यापक संघ ) रेवणनाथ कर्डिले ( सचिव, महाराष्ट्र राज्य हिंदी अध्यापक संघ ) डॉ. नेहा बोरसे (अध्यक्ष, पुणे विभाग) आदि मान्यवर उपस्थित होते. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान येथे महाराष्ट्र राज्य हिंदी अध्यापक संघाची द्विदिवसीय कार्यशाळा २१ ते २२ मे दरम्यान संपन्न होत आहे. या प्रसंगी हा पुरस्कार देण्यात आला आहे.
प्रा. अशोक ढोले हे पुण्यातील सिंबायोसिस या नामांकित महाविद्यालयामध्ये गेल्या 20 वर्षापासून अध्यापनाचे पवित्र कार्य करत आहेत. त्यांनी मागील वर्षी भारत सरकार , सांस्कृतिक मंत्रालयातर्फे हैदराबाद येथे ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020’ यावर 21 दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. यासाठी महाराष्ट्र राज्यातून निवडण्यात येणाऱ्या 10 शिक्षकांमध्ये त्यांची निवड झाली होती. तसेच त्यांनी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे आयोजित ‘ शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण २.०’ या प्रशिक्षण कार्यामध्ये तज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य केले आहे. त्यांच्या या आणि अशा अनेक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य हिंदी अध्यापक संघाकडून त्यांना हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. याबद्दल त्यांचे, सिंबायोसिस कॉलेजच्या प्राचार्या श्रीमती टेसी थडतील उपप्राचार्य ऋचा फोंडगे कॉलेजचे सहकारी, मित्र परिवार यांचेकडून अभिनंदन करण्यात आले आहे.
Comments are closed